Gangapur mahiti marathi-माझी गाणगापूर यात्रा

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

गाणगापूर म्हणेज दत्तभक्तांची पंढरीच. गाणगापूरला जाण्याची माझी बरेच दिवसांची इच्छा होती. परंतु कामाच्या धामधुमीत अगोदर काही जाणे जमले नाही. आपण वेळ काढला नाही तर थोडी सवड सापडत सुद्धा नाही हे ही खरेच. ह्यावेळेसच्या दिवाळीच्या सुट्ट्यांत मात्र मी काही दिवस अजून अजून वाढवत अखेरचे एकदा जाणे नक्की केले.

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

रात्रभराच्या प्रवासानंतर सोलापूर आणि तिथून अक्कलकोट असा प्रवास झाला आणि अक्कलकोटला दोन दिवस थांबल्यावर सकाळच्या बसने गाणगापूरला जाणे झाले. अक्कलकोटला मला थांबून निवांत श्री स्वामी समर्थ दर्शन घ्यायचे होते म्हणून मी तिथे मुक्काम करण्याचे अगोदरच ठरवून आलो होतो.

हे दोन दिवस मला बरेच सुखावून गेले. स्वामी सेवेत मन कसे प्रसन्न होते हे कुण्या स्वामीभक्ताला वेगळे सांगण्याची गरज नाही. ह्याअगोदर मी फक्त एकदा २०१७ मध्ये अक्कलकोटला गेलो होतो. त्यानंतर गेल्या उन्हाळ्यात मला अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर अशा तीर्थक्षेत्री जाण्याची अनिवार इच्छा झाली होती आणि म्हणून इंटरनेट वर तेथील माहिती मी शोधत राहायचो.

अक्कलकोट वरून वटवृक्ष मंदिराच्या (मुख्य मंदिर) जवळूनच सकाळी सकाळीच बस किंवा इतर वाहने गाणगापूरकडे सुटतात. अक्कलकोट ते गाणगापूर अंतर जवळपास ७०-७५ किलोमीटर असावे. खाजगी वाहने त्यांचे वाहन पूर्ण भरल्यावरच निघतात, त्यामुळे मला सकाळी पाच वाजल्यापासून किमान १ तास प्रतीक्षा करावी लागली. शेवटी एक बस मिळाली.

गाणगापूरला बसने जाण्यासाठी मला जवळपास दोन तास लागले असावे. गाणगापूरला पोहोचल्यावर अगोदर मला संगमावर जायचे होते. बसस्टॅण्ड जवळच १०-१५ रुपये प्रति व्यक्ती दराने ऑटो चालतात. संगमावर गेल्यानंतर प्रथम भीमा अमरजा संगमात स्नान केले. ही माझी पहिलीच गाणगापूर भेट होती आणि पुढे मी ह्या ठिकाणाशी एवढा जुळला जाईल असे कधी वाटले नव्हते.

bhima amarja sangam gangapur
भीमा-अमरजा संगम

मुख्य गावाच्या थोडा बाहेर असलेल्या ह्या भीमा अमरजा संगमाचे विशेष महत्व आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज इथेच अनुष्ठान करायचे. आजवर ज्याबद्दल ऐकलेच होते तिथे प्रत्यक्ष आल्यानंतर अवर्णनीय आनंद झाला. ही माझी पहिलीच गाणगापूर भेट होती आणि मनात सांगता न येण्यासारखे भाव निर्माण झाले.

ह्या मे महिन्यापासून मला गुरुचरित्र वाचण्याची तीव्र इच्छा होती. का व कसे? मला सुद्धा कळले नाही. शाळेत असताना मी अनेक धार्मिक ग्रंथांचे पठण कळत-नकळत केले आहे. त्यामध्ये नवनाथ पोथी सुद्धा मला आठवते. पण २०२० च्या दत्तजयंती नंतर अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर अशा दत्त क्षेत्रांना जावे असे मला वाटायचे. असो.

ह्याच महिन्यात माझ्या वाचनात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आले. गुरुचरित्र समजून मी ऑनलाइन पद्धतीने आंध्रप्रदेश येथील पिठापूर महासंस्थानामधून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत बोलावले. ते मिळाल्यावर समजले की दोन्ही ग्रंथ वेगवेगळे आहेत. गुरुचरित्र वाचनासाठी कडक नियम असतात असे कोठेतरी वाचल्यावर नंतर वाचूया असे ठरवले. त्यातही संगमावर गुरुचरित्र वाचण्याचा योग यावा अशी मनोमन इच्छा होती.

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

अक्कलकोटला वास्तव्याला असतांना एका भक्ताने तुम्ही संगमावर संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, म्हणजे तुमच्या कमी वेळेत ते पठण पूर्ण होईल व तुमची संगमस्थळी गुरुचरित्र वाचनाची इच्छा देखील पूर्ण होईल असे सांगितले. त्यामुळे मी अक्कलकोटहून येतांनाच संक्षिप्त श्री गुरुचरित्र सोबत आणले होते.

bhima amarja sangam
संगमस्थळीचा औदुंबर वृक्ष

संगमावर आता श्री गुरुचरित्र पठणाची चांगली सोय झाली आहे. बरेच वाचक एकाच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करतांना दिसतात. अशा भक्तिभावाच्या वातावरणात, जिथे अनेक जण श्री गुरुचरित्राचे पठण करत असतात तिथे आपल्या केलेल्या पारायणाने एक आनंददायक अनुभव गाठीला राहतो.

संगम स्थानावर दत्त मंदिर आहे आणि तिथून गाणगापूरकडे परत जातांना भस्माचा डोंगर आहे. संगम मंदिरापासून भस्माचा डोंगर हे अंतर अगदीच कमी आहे व तिथे पायी जाता येते . इथले भस्म म्हणजे आता मातीच्या स्वरूपात आहे आणि ते भाविक थोडे खोदून सोबत नेतात. मी सुद्धा थोडे भस्म घेतले आणि परतीचा ऑटो पकडून गावातील मुख्य मंदिरात आलो.

Gangapur mahiti marathi

bhasma hill ganagapur
भस्माचा डोंगर

तिथे येण्यापर्यंत बारा साडेबाराचा वेळ झाला होता आणि मंदिराजवळ भिक्षा मागणाऱ्यांची गर्दी होती. दुपारी बारा वाजण्याची वेळ ही श्री दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ समजली जाते व आजही कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज भिक्षेला येतात ह्याबद्दल भाविकांच्या मनात विश्वास आहे.

दुपारी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती आणि मी मंदिराच्या बाहेरून सुरु झालेल्या लांब रांगेत दर्शनासाठी लागलो. ही रांग मंदिराच्या बाहेरून सुरु झाली होती आणि वरच्या मजल्यावरून हळू हळू पुढे सरकत मग परत खाली मंदिरात उतरली होती. गर्दी नसल्यास मंदिराच्या मुख्य द्वारातून आत जाऊन सुद्धा दर्शनाच्या रांगेत लागत येते.

Gangapur mahiti marathi

संध्याकाळच्या वेळेस निघत असलेली महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याची मला इच्छा होती. ही इच्छा त्याच दिवशी परत निघणे असल्यामुळे शक्य झाले नाही, पण संध्याकाळच्या पालखी सोहळ्यातील मूर्तीचे दर्शन मला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूस झाले. तेव्हा ही मूर्ती पालखी सोहळ्यासाठी सजवली जात होती. माझ्यासाठी आश्चर्य म्हणजे मी मनोमन हीच मूर्ती शोधत होतो.

gangapur mahiti marathi

अति गर्दीमुळे गाभाऱ्यातील दर्शन मला फार वेळेस होऊ शकले नाही. गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन अजून एकदा व्हावे असे माझ्या खूप मनात होते. तेव्हा काही लोकांचे दर्शन मागील बाजूने विशेष रांगेत होत होते. तिथे उभा झाल्यावर, -पुढे चला, पुढे चला- असे कुणी ओरडले व मी सहज रांगेत लागलो आणि लगेच परत गाभाऱ्यात जाता आले. त्यानंतर चांगले दर्शन झाल्याने मनाला प्रसन्न वाटले. माझ्या मनातील दोन्ही इच्छा अशा विनासायास पूर्ण झाल्या.

Gangapur mahiti marathi

मग मंदिरातून निघाल्यावर कल्लेश्वर देवालय जाणे बाकी होते. बाहेर पडल्यावर कुणाला रस्ता विचारला तर चालत पायी जात येते असे कुणीतरी सांगितले. माझेकडे जास्त ओझे नसल्याने मी चालत गेलो. अंदाजे एक किलोमीटर अंतर असेल. कुटुंब सोबत असल्यास किंवा वेळ कमी असल्यास काही वाहन करून जाणे जास्त योग्य पर्याय आहे.

kalleshwara temple gangapur
कल्लेश्वर देवालय

परतीसाठी बसस्टॅन्ड वर बराच वेळ गेला आणि येणाऱ्या बस सुद्धा गर्दी घेऊनच येत होत्या. कसेतरी एका बसमध्ये जागा मिळवून मी अक्कलकोटला परत आलो आणि तिथे एक दिवस थांबून मग परत घराकडे परतलो.

अक्कलकोट आणि गाणगापूर मधील हे चार दिवस मला खूप ऊर्जा देऊन गेले. आध्यात्मिक स्तरावर काहीतरी अतीव आनंद वाटला. आता पुढील भेटीची आस आहे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

UPDATE: २०२३ च्या दिवाळीत परत दिवसांसाठी गाणगापूरला मुक्कामी राहण्याचा योग श्री गुरूंनी घडवून आणला आणि ह्यावेळेस सकाळची, दुपारची आरती तसेच संध्याकाळचा पालखी सोहळा मी डोळे भरून अनुभवला. मागील भेटीत न घडलेले निर्गुण पादुकांचे दर्शन ह्यावेळेस घडले, संगमस्थळी परत श्री संक्षिप्त गुरुचरित्र पठण झाले व मागील भेटीत असलेली आस ह्यावेळेस पूर्ण झाली. तरीही गाणगापूर सोडतांना एकच मागणे मागितल्या जाते कि देवा परत परत आपल्या चरणाशी बोलावून घ्या.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *