कधीतरी मी social media वर Time Billionaire हे शीर्षक वाचले आणि कुतूहल म्हणून इंटरनेट वर शोधले. “Time Billionaire” ही संकल्पना गुंतवणूकदार आणि विचारवंत Graham Duncan ह्यांनी “The Tim Ferriss Show – जो अमेरिकन लेखक, उद्योजक आणि गुंतवणूकदार Tim Ferriss यांनी सुरू केला आहे” ह्या पॉडकास्ट मध्ये सांगितली.

ह्या शो मध्ये टिम फेरीस व्यवसाय, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, वैयक्तिक विकास आणि तत्त्वज्ञान अशा क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींशी संवाद साधतो. तो या व्यक्तींना त्यांच्या यशामागील सवयी, विचारपद्धती, दिनचर्या, आणि मानसिक दृष्टिकोन याबद्दल विचारतो, ज्यातून श्रोत्यांना प्रेरणा आणि व्यावहारिक सल्ले मिळतात.
Tim Ferriss व Graham Duncan ह्यांची चर्चा
Graham Duncan हे East Rock Capital या investment firm चे सहसंस्थापक आहेत. ते वेळ (time), यश (success) आणि वैयक्तिक विकास (personal growth) याबद्दलच्या त्यांच्या सखोल विचारांसाठी ओळखले जातात. ह्या संवादातील सर्वात प्रसिद्ध संकल्पना म्हणजे “Time Billionaire”.
Graham Duncan म्हणतात की 1 million seconds = 11 दिवस आणि 1 billion seconds = 31 वर्षे होतात. (मराठीत 1 million = 10 लाख, 10 million = 1 crore, 100 million = 10 crore आणि 1 Billion = 1000 Million = 100 कोटी म्हणजेच १ अब्ज किंवा १ अरब होतात.)
त्यांनी “Dollar Billionaires” आणि “Time Billionaires” यांची तुलना केली. Billionaire म्हणजे ज्याच्याकडे अब्जावधी (बिलियन) संपत्ती आहे. त्याचप्रमाणे Time Billionaire म्हणजे ज्याच्याकडे अब्जो सेकंदांचा वेळ शिल्लक आहे; म्हणजेच भरपूर आयुष्य, वेळ, आणि संधी आहेत.
त्यांचा मुख्य संदेश असा होता: जर तुम्ही तरुण असाल, तर तुम्ही ‘Time Billionaire’ आहात – तुमच्याकडे अजून अनेक दशकांचा काळ आहे. तो वेळ विचारपूर्वक वापरा; केवळ पैशासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी सगळा वेळ वाया घालवू नका. त्यांनी सांगितले की एक अब्ज सेकंद म्हणजे साधारण ३१ वर्षं. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीजवळ अजून तीस-बत्तीस वर्षांचा काळ उरला असेल, तर तो “time billionaire” म्हणजेच वेळेचा अरबपती मानला जाऊ शकतो. हा विचार आपल्या पारंपरिक पैशावर केंद्रित समाजापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे – आपण पैशाचे अरबपती बघतो, पण वेळेचे अरबपती (Time Billionaire) होण्याचा विचार क्वचितच करतो.
Graham Duncan म्हणतात की, वर्षांऐवजी जर आपण वेळ सेकंदांमध्ये मोजायला लागलो, तर आपल्याला समजतं की ती किती विशाल आणि किती मौल्यवान (precious) गोष्ट आहे. आपण पैसा मोजता येणारी गोष्ट म्हणून पाहतो, पण वेळेचं मोजमाप तसं करत नाही – जरी वेळ पैशापेक्षाही कितीतरी अधिक मूल्यवान (valuable) असते तरीही.

ह्या संकल्पनेतून Duncan सांगतात की, जेव्हा आपण आपल्या वेळेचं ‘संपत्ती’ म्हणून मूल्य ओळखतो, तेव्हा आपण ती जपून, जाणूनबुजून वापरायला शिकतो. कुटुंबासोबत वेळ घालवणं, अर्थपूर्ण काम करणं, स्वतःसाठी क्षण राखणं — ह्या गोष्टींना मग खरी किंमत मिळते. वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपेक्षा जीवन समृद्ध करणाऱ्या अनुभवांमध्ये गुंतवणूक करणे हे महत्वाचे वाटते. Duncan म्हणतो —“आपल्याकडे अजून billions of seconds असतील, तर आपण अत्यंत श्रीमंत आहोत. पण जेव्हा आपण वयाने मोठे होतो, तेव्हा आपली time balance कमी होत जाते — आणि आपण ते लक्षातच घेत नाही.”
ह्यावर इंटरनेटवर अधिक शोधतांना एक अजून छान लेख सापडला. Sahil Bloom यांनी त्यांच्या ब्लॉग “The Time Billionaire: A Concept That Changed My Life” मध्ये Graham Duncan यांच्या या संकल्पनेचा विस्तार सुंदरपणे केला आहे. ह्या लेखातील एक paragraph मला जास्तच आवडून गेला.
लेखक लिहितो: ‘मागच्या उन्हाळ्यात मी माझ्या नवजात मुलासोबत फिरायला गेलो होतो. तेव्हा एक वृद्ध गृहस्थ माझ्याजवळ आले. त्यांनी सांगितले: “मीसुद्धा एकदा इथेच माझ्या नवजात मुलीला घेऊन उभा होतो. तेव्हा एका वृद्धाने माझ्याकडे येऊन म्हटलं होतं — ‘वेळ पटकन निघून जातो, प्रत्येक क्षण जप.’ आता माझी मुलगी ४५ वर्षांची आहे. खरंच — वेळ पटकन निघून जातो, प्रत्येक क्षण जप.” हे ऐकून माझ्या मनाला खोलवर स्पर्श झाला. दुसऱ्या सकाळी, मी माझ्या मुलाला जवळ घेतलं आणि मला एक विलक्षण जाणीव झाली — माझ्या आयुष्यात प्रथमच मला असं वाटलं की, माझ्याकडे पुरेसं आहे.‘
ह्या लेखात आपण मुलांसोबत आणि कुटुंबासोबत कसा वेळ घालवतो आणि वयानुसार तो कसा कमी होत जातो हे आलेखाच्या स्वरूपात दाखवले आहे. वाचक ह्याला सविस्तर वाचू शकतात. ह्या संकल्पनेचा सार असा आहे की वेळ ही एकच संपत्ती आहे जी परत मिळत नाही.
हौशी वाचक एक अजून लेख वाचू शकतात. Your Life in Weeks ह्या लेखात लेखकाने जीवन एका ग्रिडमध्ये पाहण्याचा प्रस्ताव दिला आहे — एक वर्ष म्हणजे 52 आठवडे, आणि 90 वर्षे म्हणजे सुमारे 4,680 आठवडे.
त्या ग्रिडमध्ये आपण मागे घेऊन पाहू शकतो की किती आठवडे आपण आधीच जगले आहेत, आणि किती आठवडे पुढे आहेत — हा दृष्टीकोन आपल्याला “वेळ वाया घालवले जात आहे का?” हे विचारायला लावतो. लेखक Tim Urban म्हणतो की प्रत्येक आठवडा (आणि प्रत्येक क्षण) महत्वाचा आहे — ते एक “रत्न” समजले जाऊ शकते. आपण त्या “रत्नांना” दोन प्रकारे वापरू शकतो: 1. आनंदीपणे जगणे — म्हणजेच त्या आठवड्याचा अनुभव घेणे. 2. भविष्यासाठी तयार होणे — ह्या आठवड्यांचा उपयोग करून स्वतःसाठी किंवा इतरांसाठी चांगले जीवन तयार करणे.
पण जो सर्वात वाईट प्रकार आहे — तो आहे असा आठवडा ज्यातून न आनंद आहे, न पुढे जाण्याचा उपयोग; अशा आठवड्यांमुळे येतो निराशा, कंटाळा, हताशा. लेखक म्हणतो की असे “Neither Weeks” कमी करण्याचा प्रयत्न केल्यास जीवनाचा अनुभव समृद्ध होतो.
(संदर्भ: 1. Graham Duncan – The Tim Ferriss Show Podcast, 2019 -Time Billionaire हा विचार Graham Duncan यांनी Tim Ferriss यांच्याशी झालेल्या The Tim Ferriss Show (Episode #362, 2019) या संवादात मांडलेला आहे. संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट tim.blog वर उपलब्ध आहे. 2. “The Time Billionaire: A Concept That Changed My Life” by Sahil Bloom. 3. Your Life in Weeks by Tim Urban)